आरोग्यदायी मूग (green gram)

आरोग्यदायी मूग

आयुर्वेदामध्ये धान्याचे वर्गीकरण करताना साधारणपणे पाच गट सांगितलेले आहेत. यामध्ये शाली धान्य म्हणजे रक्त शाळी सारखे धान्य व्रीही, शिंबी धान्य म्हणजे मूग, तूर यासारख्या डाळी, तृणधान्य म्हणजे खायला जास्त प्रमाणात अयोग्य अशा प्रकारचे धान्य यालाच शुद्र धान्य असेही म्हणतात. आणि शुक धान्य म्हणजे जव इत्यादि धान्य असे यांचे प्रकार आहेत.

यामध्ये शिंबी धान्यांचे वर्णन करताना याच्यामध्ये मुद्ग म्हणजे मूग, मटार, राजमा, चवळी, मसूर, तूर, हरभरा अशा प्रकारचे द्विदल धान्य सांगितलेले आहेत.

शिंबी धान्ये शीतवीर्य, रुक्ष म्हणजे कोरडेपणा आणणारे, कषाय आणि मधुर रसाचे, लघु म्हणजे पचायला हलके, कटू विपाकी म्हणजे पचनानंतर जास्त प्रमाणामध्ये कफ आणि पित्त वाढू न देणारे, शरीरातील मूत्र निर्मिती वरती नियंत्रण ठेवणारे त्याचप्रमाणे विबंध आणि आध्मान म्हणजे पोटामध्ये फुगारा निर्माण करणारे, वात वाढवणारे, कफाचे आणि पित्ताचे आजार कमी करणारे तसेच स्थौल्य मेदो विकार यामध्ये प्रलेप स्वरूपात उपयुक्त आहेत.

यांच्यापासून बनवलेल्या डाळी, मधुर विपाकी, जास्त उष्ण आणि जास्त थंड नाही अशा, पचण्यास जड, मलावरोध करणाऱ्या, रुचीप्रद, रुक्षता वाढवणाऱ्या वात, आणि पित्त दोष वाढवणाऱ्या आहेत. त्याच प्रमाणे शरीरातील अग्नी, डोळ्यांची कार्यकारीता कमी करणारे आहेत. सूज आणि मधुमेह या आजारांमध्ये पथ्यकर आहेत.

यामध्ये मुगाची डाळ अतिशय श्रेष्ठ सांगितलेली आहे. मूग हे शिंबी धान्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेले आहेत. याचे हरीत मूग, पीत मूग, कृष्ण मूग आणि वन्य मूग असे प्रकार पडतात. आपल्याकडे मिळणारा प्रामुख्याने हरित मूग असतो. यामध्ये हरित आणि पीत मूग पुष्टी कारक आणि बलवर्धक आहेत. आवाज चांगले करणारे, शरीराला बल देणारे, कफ आणि पित्त यांचा नाश करणारे, चवीला तुरट आणि थोडेसे मधुर, शरीरामध्ये थंडपणा उत्पन्न करणारे, शरीरातले पाणी अल्प प्रमाणामध्ये शोषून घेणारे, पचायला हलके आणि डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहेत.

यांच्या डाळीचे पण थोड्याफार प्रमाणात तसेच गुणधर्म आहेत. साधारणपणे पचनशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मुग पचू शकतात त्यामुळे मुगाची डाळ पचण्यासाठी इतर डाळींपेक्षा हलकी मानली गेलेली आहे. आयुर्वेदामध्ये यूष नावाची एक संकल्पना आहे. यूष म्हणजे बोलीभाषेमध्ये सूपासारखा पदार्थ. अशाप्रकारे भाजलेल्या मुगाच्या डाळीचे सूप जर आपण काही विशिष्ट पद्धतीने घेतले तर अनेक आजारांवर गुणकारी आहे. अग्निमांद्य असताना, पचनशक्ती व्यवस्थित नसताना, आजारी असताना, पंचकर्म झाल्यानंतर अग्नी व क्षुधा वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे पचायला हलके, तसेच प्रोटीन ज्याच्यातून मिळतील अशा प्रकारचे धान्य म्हणजे मूग. या मुगाचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करावा.

आयुर्वेदामध्ये पथ्यकर आहार रक्त शाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ आणि मुद्गयूष म्हणजे मुगाचे कढण किंवा मुगाचे सूप यांचे सेवन करायला सांगितले आहे. हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला श्रेष्ठ आहार आहे. अशाप्रकारे मुगाचे सेवन केल्यास कफ व पित्त दोष वाढत नाहीत, यामध्ये थोडेसे तूप टाकून सेवन केल्यास वात दोषही नियंत्रणात राहतो. शरीराला बल आणि पोषण मिळते. मधुमेह, सूज येणे, वजन वाढणे अशा सारख्या विकारांमध्ये देखील मूग हे अतिशय पथ्यकर आहेत. याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात अवश्य करावा.

 

वैद्य श्रीरंग छापेकर एम. डी. (आयुर्वेद)

Director Scientific services

श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद 

 


Buy Ayurvedic Moong products


 

 

Share this blog now

Share blog on whatsapp