व्यायाम आणि आयुर्वेद

मित्रांनो आपण व्यायाम करतो, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करण्याची गरज आणि व्यायाम करण्याच्या पद्धती याची पुष्कळशी विस्तृत माहिती सध्या या माहिती युगात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या ग्रंथांचे तसेच वेगवेगळ्या व्हिडिओचे संदर्भ देऊन कोणत्या आजारावरती कोणता व्यायाम करावा आणि कोणत्या आजारावरती कोणते योगासन करावे यांचे तर पेवच फुटलेले दिसते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणारी आसने आणि व्हिडिओ पाहून केली जाणारी आसने यांच्यात तर जमीन-अस्मानचा फरक आहे.

साधारण व्यायाम किती करावा? व्यायाम केल्याने नेमका फायदा कशाचा होतो? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा का? वजन उचलणे, हाताने किंवा पायाने वेगवेगळ्या कोनामधून वजन उचलणे, मास पेशी सुडौल बनवणे आणि आपली शरीरयष्टी चांगली दिसणे एवढीच व्यायामाची उद्दिष्टे आहेत का?

त्याच प्रमाणे साधारण 15 ते 20 मिनिटे व्यायाम करावा, चाळीस मिनिटे, एक तास फिरायला जावे असे आधुनिक विचार देखील आढळतात. काही लोक त्यांना नियम देखील संबोधतात. पण हे नियम आहेत सिद्धांत नव्हे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हे परिवर्तनशील आहेत. व्यक्तिपरत्वे, व्याधी परत्वे, ऋतुपरत्वे यामध्ये बदल करणे अपेक्षित असते. त्यामुळे हा सिद्धांत नाही. पंधरा-वीस मिनिटं, अर्धा तास व्यायाम करणार किंवा 200 - 400 कॅलरीज व्यायाम करून खर्च करणार आणि आपले शरीर फिट ठेवणार म्हणजेच व्यायाम असे जर म्हटले तर ती व्यायामाची व्याख्या थोडी उथळ स्वरूपाची होईल असे वाटते.

अंग दुखते, थोडा ताप आहे आणि सकाळी एखादी पेन किलरची गोळी घेऊन 5-5 किलोमीटर दररोजचे पळायचे आहे ते झालेच पाहिजे असे म्हणून व्यायाम करणारे सुद्धा महाभाग आहेत. आणि काही तर वैद्यकीय शास्त्रातले तज्ञ मंडळी पण आहेत. पण खरंच असं सांगा मित्रांनो, आपण आजारी असू, आपल्या शरीर थकलेले असेल, आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघडले असेल तर असा नियमिततेचा अतिरेक करणे योग्य आहे का?

मित्रांनो, आयुर्वेदात तर याच्या विषयी फार सुंदर वर्णन आढळते. न बदलणारा सिद्धांतच आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे. ज्याने त्याने आपल्या शक्‍तीच्या निम्म्या मात्रेमध्येच व्यायाम करावा हा आयुर्वेदिक सामान्य सिद्धांत आहे. पण या बरोबरच आयुर्वेद सांगतं की ज्यांना बरे नाही, त्यांची तब्येत ठीक नाही, ज्यांच्या शरीरामध्ये वार्धक्याची लक्षणे आलेली आहेत, बालवयातील  आहेत, तसेच ज्यांना पचनासंबंधी विकार झालेले आहेत त्यांनी व्यायाम करू नये हा विशेष नियम आहे.

मित्रांनो, अर्ध शक्ती ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते हे आयुर्वेदाने सगळ्यात पहिल्यांदा नमूद केलेले आहे. अष्टांग संग्रह कारकांच्या मध्ये व्यायाम करत असताना आपल्या काखेच्या दोन्ही बाजूंना, नाकावरती, कपाळावरती घाम येऊ लागणे हृदयातील स्थिर असलेला वायू तोंडाजवळ म्हणजेच आपल्याला श्वासोच्छवास नाकाने घेण्याच्या ऐवजी तोंडाने करावासा वाटणे म्हणजे अर्ध शक्ती झाली आहे असे समजावे आणि व्यायाम थांबवावा इतकी साधी आणि सोपी अर्ध शक्ती ची लक्षणे दिलेली आहेत. म्हणजेच ज्यांची योग्य शक्ती आहे त्यांनी कदाचित एक तास जरी व्यायाम केला तरी त्यांना अशी लक्षणे दिसणार नाहीत आणि त्यांची शक्ती अतिशय कमी आहे त्यांना केवळ दहा मिनिटात सुद्धा अशी लक्षणे दिसू शकतील त्यामुळे व्यायामाची वेळ ही आपापली ठरलेली असावी. तीस मिनिट, अर्धा तास, एक तास अशी नसावी तर शरीराच्या अर्ध शक्ती मात्रेत असावी. यामुळे येथे नमूद करावेसे वाटते की कोणीही आपली व्यायामाची तुलना इतरांसोबत करू नये. आपल्या शरीराच्या अर्ध शक्तीच्या मात्रेत व्यायाम जरूर करावा आणि आयुर्वेदाचे नियम पाळूनच व्यायाम करावा.

सर्वे सन्तु निरामयाः।

वैद्य श्रीरंग छापेकर एम. डी. (आयुर्वेद)

Director Scientific services

श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद 

 


Buy Post exercise Ayurvedic diet products


Share this blog

Share blog on whatsapp