आरोग्यं धनसंपदा - वर्षाऋतुतील आहार आणि विहार -
नमस्कार मित्रांनो.....वर्षाऋतु सुरू आहे , त्यामुळे आज आपण त्याबद्दल थोडं बघूया . जो व्यक्ती ऋतुनुसार आहार विहार करतो तो शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहतो. आता ऋतु म्हणजे
काय....? ते पहिले बघू. सूर्य , चंद्र, पृथ्वी आणि वायु यांच्या गतीवर दिवस , रात्र , अयन , ऋतु , संवत्सर इ. अवलंबून असतात. पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरत असते ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात.पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या एका परिक्रमेला चोवीस तास लागतात . यालाच आपण एक दिवस म्हणतो , अर्थात बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र. आणि यासोबतच पृथ्वी सूर्याभोवती ही फिरत असते ज्यामुळे ऋतु , अयन , वर्ष निर्माण होतात. सूर्याभोवती एक परीक्रमा पूर्ण करण्यास पृथ्वीला
जो कालावधी लागतो त्यास एक संवत्सर अर्थात वर्ष असे म्हणतात. सूर्यसिद्धांतानुसार ,
भानोर्मकरसंक्रान्तेः षण्मासा उत्तरायणम् । कर्कादेस्तु तथैव स्यात् षण्मासा दक्षिणायनम् ।।
स्वतःभोवती आणि त्याचवेळी सूर्याभोवती फिरत असतांना पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्या भागावर सूर्याच्या उष्णतेचा जास्त प्रभाव पडतो. उत्तरायण कालात ही स्थिती असते. आणि दक्षिणायनात याच्या विरूद्ध स्थिती असते. अर्थात सूर्यापासून दूर असणार्या भागात शीतलता अधिक असते.
आदत्ते पृथिव्याः सौम्याशं प्राणिनां बलं चेत्यादानम् ।
उत्तरायणात पृथ्वी सूर्याच्या जवळ येत असल्याने पृथ्वीवरील सौम्यांशाचं / जलीय अंशाचं शोषण होतं , शुष्कता वाढते परीणामी प्राणीमात्रांचे , वनस्पती इ. बल कमी होते , सूर्य दिलेले दान शोषून घेतो म्हणून आदानकाल .
विसृज्यति ददाति पृथिव्याः सौम्याशं प्राणिनां बलं चेति विसर्गः ।
दक्षिणायनात पृथ्वी सूर्यापासून दूर जाते . त्यामुळे उष्णता कमी आणि शीतलता जास्त असते. सौम्यांशाचं पोषण , रक्षण होतं , म्हणून हा विसर्गकाल.
प्रामुख्याने शिशिर , वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत हे सहा ऋतु आहेत . स्थानपरत्वे यातही मतेमतांतरे आहेत. तूर्तास आपण या सहा ऋतुंबाबत विचार करू . प्रत्येक ऋतुत दोन महिने गणले जातात. 1)शिशिर - माघ , फाल्गुन , 2) वसंत - चैत्र , वैशाख , 3) ग्रीष्म - ज्येष्ठ , आषाढ , 4) वर्षा - श्रावण , भाद्रपद , 5) शरद - अश्विन , कार्तिक , 6) हेमंत - मार्गशीर्ष , पौष . हा विषय खूप मोठा आहे. याठिकाणी आपण सध्या निसर्गात नैसर्गिकपणे जे बदल होतात त्यानुसार आपण आपला आहार विहार ठेवला तर स्वस्थ राहण्यास ते उपयोगी असते . म्हणून ही थोडीशी तोंडओळख म्हणून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
आदानकालात शिशिर , वसंत , ग्रीष्म हे ऋतु येतात तर विसर्ग कालात वर्षा , शरद ,हेमंत हे ऋतु येतात.
आता आदानकाल संपून विसर्गकाल सुरू होतोय. पहिलाच ऋतु वर्षा . मेघाच्छादित ढग , वायु , वर्षा यामुळे ग्रीष्माची उष्णता कमी व्हायला लागते . स्निग्धता , आम्ल , लवण आणि मधुर रसाची वाढ होते ,जलीय अंश पृथ्वीवर वाढल्याने हे घडते . परिणामी प्राणीमात्रांचे, वनस्पतींचेही बल वाढते. कारण हे रस बल वाढण्यास मदत करणारे आहेत. आदानकालात सूर्यतापाने दुर्बल झालेल्या शरीरातील जाठराग्निही दुर्बल झालेला असतो. लगेच येणार्या वर्षाऋतुमुळे जल आणि वायु ही दूषित होतो परिणामी जाठराग्नि अजून दुर्बल होतो. तापलेल्या जमिनीवर पडणारा पाऊस वात दूषित करतो. म्हणून या ऋतुत नियमांचे कटाक्षाने पालन करायला हवे. कारण वात प्रामुख्याने आणि पित्त आणि कफ तद्अनुसार दूषित झाल्याने तिन्ही दोष समावस्थेत नसतात. अग्नि क्षीण झालेला असतो . म्हणून हा अग्नि वाढेल , भूक वाढेल असा आहार सेवन करावा. आहारात मधाचे सेवन या ऋतुत करावे. आंबट तसेच लवण रसात्मक तेल तूपाचा यथोचित संस्कार असलेला आहार असावा . प्रामुख्याने आहारात तूपाचा समावेश असावा. जुने गहू , तांदूळ, ज्वारी वापरावे. धान्य जुने झाले की त्यातला जलीय अंश कमी होतो आणि ते पचनास हलके होते . मूगाचे तूप जीर्याचे फोडणीचे यूष अर्थात पातळ वरण आहारात घ्यावे. आहार ताजा , गरम आणि पचण्यास हलका असावा. थंड झालेले , शिळे अन्न सेवन करू नये. आधीच वात वाढलेला असतो या ऋतुत त्यामुळे वातवर्धक वांगे , वाल ,चणाडाळ इ. शक्यतो सेवन टाळावे अथवा अल्पमात्रेत घ्यावे. दही खावू नये त्याऐवजी तूप जीर्याची फोडणी केलेले पातळ ताक घ्यावे . शाकाहार , मांसाहार जो ही असेल तो संस्कारीत म्हणजे शिजवण्याचा कुठला तरी संस्कार केलेला असावा .कच्च्या स्वरूपात शक्यतो घेऊ नये. या ऋतुत पाण्यात मध मिसळून सेवन करावे. वर्षाऋतुतील क्लेदाचं / अतिरीक्त जलाचं शमन मध करतं म्हणून ....पण ते ही प्रमाणातच वापरावे. पाणी शक्य झाल्यास गरम करून थंड केलेले पिण्यास वापरावे. व्यायाम या ऋतुत हलका करावा. शरीर थकेल एवढा करू नये .कोरडे उटणे स्नानापूर्वी शरीरावर घासावे , याला प्रघर्षण , उद्वर्तन असे म्हणतात. कोष्ण जलाने स्नान करावे. चंदन , सुगंधी द्रव्य , सुगंधी फुलं धारण करावी. हलके आणि कोरडे कपडे घालावे . आपण राहतो ती जागा कोरडी राहील असे पहावे.
या साध्या साध्या नियमांचे पालन जर केले तर कुठलाही त्रास न होता आम्ही स्वस्थ राहू शकतो . तेंव्हा नियमांचे पालन करा आणि मस्त पावसाचा आनंद घ्या . पुन्हा भेटूच ..
तोपर्यंत नमस्कार.....
वैद्य सौ समिधा चेंडके, नागपूर
----------------------------------------------------------
Authentic Ayurved Diet
----------------------------------------------------------
Share this BLOG