आरोग्यदायी लालतांदूळ रक्तशाली
आयुर्वेदामध्ये धान्याचे वर्गीकरण करताना साधारणपणे पाच गट सांगितलेले आहेत यामध्ये शाली धान्य म्हणजे रक्त शाळी इत्यादी, व्रीही धान्य म्हणजे बाकीचे गहू यासारखे पदार्थ, शिंबी धान्य म्हणजे मूग, तूर यासारख्या डाळी, तृणधान्य म्हणजे खायला जास्त प्रमाणात सांगितले नाहीत अशा प्रकारचे धान्य यालाच शुद्रधान्य असेही म्हटले आहे आणि शुकधान्य म्हणजे जव इत्यादी धान्य असे यांचे प्रकार आहेत.
यामध्ये शाली धान्य अत्यंत श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. शाली मध्ये रक्त शाली लोहितक, पांडुक, शकुनावृत, सुगंधीक, महा शाली, कलम आणि कलामत असे भेद सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या जाती सुद्धा सांगितल्या आहेत.
शालींचे वर्णन करताना आयुर्वेदामध्ये त्यांचे गुणधर्म देखील सांगितले आहेत. या शाली धान्यांमध्ये आपण खातो ते सगळे भाताचे प्रकार येतात. यामध्ये लाल तांदूळ म्हणजेच रक्तशाली अत्यंत श्रेष्ठ आहेत असे सांगितले आहे. आणि त्यातल्या त्यात षष्टिक रक्त शाली म्हणजे साठ दिवसांमध्ये होणारे तांदूळ श्रेष्ठ सांगितले आहेत. शालींचे गुणधर्म सांगताना शाली या लघु म्हणजे पचायला हलक्या, स्निग्ध, रसाने आणि पचन शक्तीने मधुर आणि अनुरसाने कषाय, हृदयाला हितकर, रुची वाढवणाऱ्या, मलप्रवृत्ती बांधून करणाऱ्या, थंड गुणात्मक, शरीरातल्या धातूंना पौष्टिकता आणणाऱ्या आणि धातूंचे वर्धन करणाऱ्या तसेच शुक्र निर्मिती करणाऱ्या आहेत. या शाली लवकर पचतात, मूत्रप्रवृत्ती वाढवतात, पित्तशामक आणि किंचित वात आणि कफ यांनावाढवणार्या त्याच प्रमाणे बलवर्धक आहेत. आवाज उत्तम करणाऱ्या आहेत. हे साधारण सगळ्या तांदळाचे गुणधर्म झाले, परंतु रक्त शाली म्हणजे त्यातल्या त्यात लाल तांदूळ अतिशय श्रेष्ठ आहेत. हे चक्षुष्य आहेत म्हणजे डोळ्यांना हितकर आहेत, शुक्र वाढवणारे आहेत, शरीराचे बल वाढवून पुष्टी दायक काम करणारे आहेत अग्नि वाढवणारे आहेत मूत्रल आहेत हृदयाला हितकर उत्तम स्वर निर्माण करणारे, शरीराचा वर्ण आणि बल वाढवणारे, वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना वाढू न देणारे, त्याचप्रमाणे तहान घालवणारे, एखादी जखम झाली असेल तर लवकर बरे करणारे, दमा, खोकला, दाह, उष्णता आणि विष यांना नष्ट करणारे आहेत.
रक्त शाली शिजवण्याची पद्धत अत्यंत साधी आणि सोपी आहे. सर्वप्रथम स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत, नंतर ते पाणी काढून टाकावे. त्यानंतर त्यामध्ये नवीन पाणी टाकल्यावरती पूर्ण शिजवून होत नाही तोपर्यंत गॅस वर ठेवावेत. शिजवल्यानंतर देखील त्यामध्ये पाणी शिल्लक राहिले पाहिजे एवढे पाणी त्यात असावे आणि शिजल्यानंतर उरलेले पाणी वेगळे काढून शिजलेला भात खाण्यासाठी वापरावा. हा भात रक्तातील साखर देखील वाढू देत नाही. याचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर तांदळापेक्षा कमी असल्यामुळे बाकीच्या तांदळापेक्षा मधुमेही रुग्णांनी हा तांदूळ कमी मात्रेत खाल्ला तरी चालतो.
आयुर्वेदातील पथ्य कल्पनेमध्ये पंचकर्म झाल्यानंतर अग्नि वाढवण्यासाठी तसेच पचनशक्ती वाढवण्यासाठी मंड, पेया आणि विलेपी या तिन्ही कल्पनांचा उपयोग करतात. या तिन्ही कल्पना रक्त शालींपासूनच तयार करतात. तांदळाच्या 14 पट पाणी घालून तांदूळ वेगळे काढून केवळ पाणी म्हणजे मंड. यामध्ये जर काही शिजलेल्या तांदळाचे कण आणि सहा पट पाणी असेल तर पाणी आणि शिजवलेले तांदूळ असे मिळून पेया आणि तांदूळ पूर्ण शिजल्यावर ती थोडेसे पातळसर असणे आणि चार पट पाणी घालून शिजवलेली असणे म्हणजे विलेपी. अशाप्रकारे अत्यंत गुणकारी असलेले रक्त शाली वरील गुणधर्मामुळे शरीराला हितकारक, बल वाढवणारे, ताप, खोकला श्वास यासारखे आजार आटोक्यात ठेवणारे, शरीराचा वर्ण, कांती वाढवणारे, पचायला हलके, चविष्ट आणि सहज मिळणारे असल्याने दैनंदिन आहारात देखील याचा वापर अवश्य करावा.
वैद्य श्रीरंग छापेकर एम. डी. (आयुर्वेद)
श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद
Buy RaktaShali Products
Click here to share this blog